Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 20 November, 2008

श्रीकृष्णाचे विचार अंगी बाणवा - ब्रह्मेशानंद


"संभवामि...' महानाट्याचा थाटात समारोप
फोंडा, दि.१९ (प्रतिनिधी) - श्रीकृष्णाचे चरित्र आदर्श आणि अनुकरणीय आहे. मनुष्याने वैयक्तिक जीवनात त्याला स्थान देऊन त्यातील आदर्श विचार अंगी बाणावे, असे आवाहन कुंडई येथील तपोभूमी पीठाधीश प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज यांनी आज संध्याकाळी फर्मागुडी येथे केले.
श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाने फर्मागुडी येथे आयोजित "संभावामि युगे युगे....' या श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्याच्या शुभारंभी प्रयोग मालिकेच्या समारोप सोहळ्यात प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी बोलत होते. यावेळी वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, मंडळाचे अध्यक्ष अरुण देसाई, दिग्दर्शक दिलीप देसाई, लेखक डॉ. नारायण देसाई, नेपथ्यकार दयानंद भगत, प्रकाश योजनाकार सतीश गवस, वेषभूषाकार दिगंबर सिंगबाळ, रंगभूषाकार दास कवळेकर, राजू देसाई व मान्यवर उपस्थित होते.
श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्य हे आपल्या संस्कृतीचे मोठे वैभव आहे. आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माचे ऐश्वर्य महान असून विजयादुर्गा मंडळाने महानाट्याच्या स्वरूपात सांस्कृतिक वैभव आपल्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगून स्वामी ब्रह्मेशानंद म्हणाले की, आजचे राजकारणी, समाजकारणी व इतरांच्या समोर आदर्श विचार ठेवण्याचे काम आयोजकांनी नाट्यांच्या स्वरूपात केले आहे. ह्या महानाट्यातून बोध घेण्याची गरज आहे. ह्या महानाट्याचे प्रयोग देश आणि विदेशात सुध्दा व्हावेत, असा आशीर्वाद स्वामी ब्रह्मेशानंद यांनी दिला.
वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मनोगत व्यक्त केले. महानाट्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. आणखी प्रयोग आयोजित करण्याची मागणी केली जात आहे. तरीही शुभारंभी प्रयोगाची मालिका अकरा प्रयोगानंतर बंद केली जात आहे, असे मंत्री श्री. ढवळीकर यांनी सांगितले.
मंडळाचे अध्यक्ष अरुण देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन भूषण भावे आणि संगीता अभ्यंकर यांनी केले. यावेळी मंडळाने काढलेल्या "श्रेय नामावली' या स्मरणिकेचे प्रकाशन प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.

No comments: