Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 17 November, 2008

आरडीएक्सचा वापर झाला नसल्याचे सिद्ध

कर्नल पुरोहितांवरील आरोप खोटे

मुंबई एटीएस संशयाच्या घेऱ्यात

नवी दिल्ली/मुुंबई, दि. १६ - भारत आणि पाकिस्तानला जोडणाऱ्या समझौता एक्सप्रेसमध्ये आरडीएक्सचा कोणताही वापर करण्यात आला नव्हता, असा खुलासा केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा आणि न्यायसहायक प्रयोगशाळांसोबतच हरयाणा पोलिसांनीही केल्यामुळे, लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यावर मुंबई एटीएसने आरडीएक्स संदर्भात लावलेले आरोप खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्त्वाची बाब अशी की, मुंबई एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना ही वस्तुस्थिती माहीत असतानाही, पुरोहित यांनी समझौता एक्सप्रेसमध्ये आरडीएक्सचा वापर केल्याची चक्क खोटी माहिती नाशिक न्यायालयाला देऊन त्यांची आणखी चार दिवसांची कोठडी मिळविल्याने केंद्रीय तपास यंत्रणांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
हरयाणाचे पोलिस उपमहानिरीक्षक (गुन्हे) आर. सी. मिश्रा यांनी काल याप्रकरणी खुलासा करताना सांगितले की, समझौेता एक्सप्रेसमध्ये ज्या घातक स्फोटकांचा वापर करण्यात आला, त्यात आरडीएक्सचा वापर झाल्याचे कोठेही आढळून आले नाही. या स्फोटात पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फर यांचे मिश्रण असलेले बॉम्ब तयार करण्यात आले होते आणि ते सहा सूटकेसमध्ये दडवण्यात आले होते. या बॉम्बसोबतच केरोसीनने भरलेल्या बाटल्याही ठेवण्यात आल्या होत्या. या बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर गाडीला आग लागावी, हाच त्यांचा उद्देश होता आणि तो सफलही झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत ६७ जण आगीत होरपळून मरण पावले होते. त्यात काही पाकिस्तानी नागरिकांचाही समावेश होता.''
एनएसजीचा खुलासा
समझौता एक्सप्रेसमधील स्फोटात कोणती स्फोटके वापरण्यात आली, याचे सूक्ष्म परीक्षण राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (नॅशनल सिक्युरिटी गार्डस्) न्यायसहायक प्रयोगशाळेत करण्यात आले होते. तसेच केंद्रीय न्यायसहायक प्रयोगशाळेतही परीक्षण करण्यात आले होते. पण, या दोन्ही महत्त्वाच्या केंद्रीय संस्थांनी स्फोटात आरडीएक्सचा वापर करण्यात आला नाही, असा स्पष्ट अहवाल दिला होता.
एनएसजीची प्रयोगशाळा ही अतिशय अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहे आणि त्यांचा अहवाल हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. असे असताना सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचे अहवाल डावलून मुंबई एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी पुरोहित यांच्यावर खोटे आरोप तर लावलेच, सोबतच न्यायालयालाही खोटी माहिती देऊन न्यायालयाचा अवमान केल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.
काल पुरोहित यांना न्यायालयात उपस्थित करून एटीएसने पुरोहित यांची पोलिस कोठडी मागितली. एटीएसचे वकील अजय मिश्रा यांनी न्यायालयाला सांगितले की, समझौता एक्सप्रेसमधील स्फोटाच्या कटात पुरोहित यांचा सहभाग असून, त्यात ६० किलो आरडीएक्स वापरले गेल्याची माहिती आमच्याकडे आहे आणि त्याचा तपास करण्यासाठी पुरोहित यांची आणखी चार दिवसांची पोलिस कोठडी आम्हाला हवी आहे.
मिश्रा यांच्या या आरोपाला पुरोहित यांचे वकील अविनाश भिडे यांनी तीव्र आक्षेप घेतला. मिश्रा यांनी न्यायालयाला सांगितले की, एटीएसने जे काही म्हटले आहे त्यात पुरोहित यांचा कोणताही सहभाग असल्याचे म्हटलेले नाही. आम्ही ही बाब आरोपपत्र जेव्हा दाखल होईल, त्यावेळी कोर्टाच्या लक्षात आणून देणार आहोत.
नागौरीची नार्को टेस्ट
समझौता एक्सप्रेसमध्ये अटक करण्यात आलेला आरोपी सिमीचा प्रमुख सफदर नागौरी याने आपल्या नार्को चाचणीत स्पष्टपणे म्हटले होते की, समझौता एक्सप्रेसमधील स्फोटात वापरले गेलेले बॉम्ब आम्हीच तयार केले होते आणि त्यासाठी पाकिस्तानातील आमच्या काही सहकाऱ्यांची मदतही घेतली होती. नागौरी याने या कटात सहभागी असलेल्या अब्दुल रज्जाक आणि मिसबुल यांचीही नावे घेतली होती आणि त्यांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते, असेही चाचणीच्या वेळी सांगितले होते. यापैकी एकाचे नातेवाईक पाकिस्तानात राहत असून तो अनेकदा पाकिस्तानात गेला होता, असेही नागौरीने म्हटले होते. हेमंत करकरे यांना या सर्व घटनाक्रमाची पूर्ण माहिती होती. तरीसुद्धा त्यांनी समझौता एक्सप्रेसमध्ये आरडीएक्सचा वापर झाल्याचा दावा केल्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांसह राज्यातील अन्य तपास यंत्रणाही बुचकळ्यात पडल्या आहेत. कारण, करकरे यांनी एनएसजी, केंद्रीय न्यायसहायक प्रयोगशाळा, हरयाणा पोलिस, सीबीआय या साऱ्याच तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह लावले आहे, अशी चर्चा पोलिस वर्तुळात आहे.

No comments: