Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 18 November, 2008

समझौता एक्स्प्रेसमध्ये आरडीएक्स नव्हतेच, महाराष्ट्र एटीएसचे घूमजाव

मुंबई, दि.१७ : समझौता एक्स्प्रेसमध्ये गेल्यावर्षी जो स्फोट झाला होता, त्यात ले.कर्नल श्रीकांत पुरोहित यांनी पुरविलेल्या आरडीएक्सचा वापर करण्यात आला नव्हता, असे सांगत महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) घूमजाव केले आहे.
समझौता एक्स्प्रेसमध्ये आरडीएक्सचा वापरच झाला नव्हता असा अहवाल न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेने दिल्यानंतर आता एटीएसला आपले आधीचे बयाण बदलणे भाग पडले असून, या प्रकारामुळे एटीएसच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
मालेगावच्या बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएसच्या ताब्यात असलेले ल. कर्नल श्रीकांत पुरोहित यांनीच समझौता एक्स्प्रेसमधील स्फोटासाठी आरडीएक्स पुरविले होते, असा आरोप एटीएसने यापूर्वी केला होता. आता आरडीएक्सचा वापरच झाला नसल्याचे स्वत: एटीएसनेच म्हटले आहे. यावरून याप्रकरणात काही काळेबेरे तर नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.
मीडियालाच दोष
आपले पितळ उघडे पडल्यावर आता एटीएसने मीडियालाचे दोष देणे सुरू केले आहे. समझौता एक्स्पेसमधील स्फोटात पुरोहित यांनी चोरलेल्या आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता असा दावा एटीएसचे वकील अजय मिश्रा यांनी शनिवारी नाशिकच्या न्यायालयात केला होता. आता एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे म्हणतात की, एटीएसच्या बयाणाचे वृत्त योग्यरित्या देण्यात आले नाही. त्याचा विपर्यास करण्यात आला होता.
एटीएसच्या या घूमजावमुळे आता संपूर्ण तपास कार्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मालेगाव स्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची नार्को चाचणी झाली असता त्यांनी ले. कर्नल श्रीकांत पुरोहित यांचे नाव घेतल्याचा दावा करीत एटीएसने पुरोहित यांना ताब्यात घेतले होते. नंतर त्यांच्यावर आरडीएक्स पुरविल्याचा आरोपही केला होता. सुरुवातीला पुरोहित यांना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. १५ ला त्यांना पुन्हा नाशिकच्या न्यायालयात हजर करून आरडीएक्स पुरविल्याचा आरोप ठेवत एटीएसने पोलिस कोठडीची मुदत वाढवून मागितली होती. त्याप्रमाणे पुरोहित यांना १८ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेशही झाले होते.
परंतु, ज्या आधारावर एटीएसने पोलिस कोठडी मागितली होती, तो आधार स्वत:चा एटीएसने गमावला आहे. आरडीएक्सचा वापरच झाला नसल्याचे एटीएसनेच स्पष्ट केल्याने संपूर्ण तपासकार्यच अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे.
समझौता एक्स्प्रेसमध्ये झालेल्या स्फोटात आरडीएक्सचा वापर करण्यात आला नव्हता असा खुलासा केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा आणि न्यायसहायक प्रयोगशाळांसोबतच हरयाणा पोलिसांनीही दिल्याने एटीएसचे संपूर्ण तपासकार्य संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

No comments: